राज्यातील पहिले पुणे शहर रेबिज मुक्त होणार !
पुणे शहर २०३० मध्ये होणार ‘रेबिज’ मुक्त !
महापालिका आरोग्य विभागात कृतीदलाची स्थापना ; कुत्र्यांची नसबंदी व शस्त्रक्रियेवर भर
पुणे ः सरकारच्या धोरणानुसार राज्यातील पुणे शहर हे २०३० पर्यंत रेबिज मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रेबिज निर्मूलनासाठी शहरातील नागरिकांच्या व प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. यासह नागरिकांमध्ये रेबिज विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी सत्तर टक्के प्रतिकारशक्ती ( हार्ड इम्युनिटी) तयार करण्याचा प्रयत्न असणार असल्याची माहिती पुणे महापालिकेचे मुख्य पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.
रेबीज आजारावर उपचार नाहीत. प्रतिबंधात्मक उपायोजना हाच एकमेव मार्ग आहे. कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा आजार जीवघेणा असून वेळीच योग्य उपचार मिळाले तरच जीव वाचवता येऊ शकतो. कुत्रा चावल्यानंतर वैद्यकीय उपचारांबाबत खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे. त्यामुळे रेबीजमुळे गेल्या वर्षी पुणे शहरात सहा तर शहराबाहेरील तब्बल ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारच्या रेबिज निर्मूलन अभियानात राज्यातील पुणे शहर व मुंबई ही दोन शहरे २०३० पर्यंत रेबिज मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने कृतीदलाची ( टास्कफोर्स) स्थापना केली आहे.
पुणे शहरात भटक्या व मोकाट कुत्रयांवर नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण विविध संस्थांच्या माध्यमातून होते. ब्लूक्रॉस सोसायटी, ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन, युनिवर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी अशा संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी पुणे शहरातील भटक्या कुत्रांना ॲंटीरेबीजची लस दिली जाते. गेल्या साडे सहा वर्षांत या संस्थांनी ५७ हजार ४७४ कुत्रयांवर नसबंदी शस्त्रक्रिया व ॲंटीरेबीजची लस दिली आहे. पुणे शहर २०३० पर्यंत रेबिज मुक्त होणार असल्याचा दावा पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. त्यासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे.
चौकट १
रेबीज एक विषाणूजन्य आजार
प्राण्यांनी चावल्यामुळे विशेषत: कुत्रा चावल्यामुळे पसरणारा रेबीज हा एक विषाणूजन्य ( व्हायरस) आजार आहे. रेबीजचा विषाणू शरीरात शिरल्यानंतर मज्जासंस्थेवर ( सेंट्रल नर्व्हस सिस्टम) हल्ला करतो. यामुळे डोक्यात आणि मणक्यात सूज येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार रेबीज व्हायरस रुग्णांच्या डोक्यात शिरला तर रुग्ण कोमात जातो किंवा मृत्यू होऊ शकतो. काही रुग्णांमध्ये पॅरालिसिसची ( लकवा) समस्या निर्माण होऊ शकते.
चौकट
गेल्या दीड वर्षांत ३५ हजार ९७३ जणांना कुत्र्याचा चावा
यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यात १२ हजार ९८५ पुणेकरांना कुत्र्याने चावा घेतला आहे. तर गेल्या दीड वर्षांत ३५ हजार ९७३ जणांना कुत्राने चावा घेतल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागात आहे. महापालिकेच्या शहरातील कमला नेहरू , राजीव गांधी या मुख्य रुग्णालयात व ५० दवाखान्यात ॲंटीरेबीजची लस उपलब्ध आहे. त्यामुळे ही रुग्णाला मोफत उपलब्ध असल्याची माहिती डॉ. सारिका फुंडे यांनी सांगितले.
कोट
‘‘ केंद्र सरकारचे रेबिज मुक्त भारत अभियान सुरू झाले आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यातील राज्यातील पुणे व मुंबई ही दोन शहरे घेतली आहेत. २०३० पर्यंत राज्यातील पुणे शहर हे पहिले रेबिज मुक्त शहर करण्याचे उद्दिष्ट आहे. आरोग्य विभागाने कृतीदल स्थापन केले आहे. केंद्र सरकारकडून ॲंटीरेबीज लस खरेदी करण्यासाठी दीड कोटी रूपयांची मागणी केली आहे. .’’